महाविद्यालयीन विद्यार्थिनीची सायबर चोरट्यांनी सव्वा २ लाखांची फसवणूक ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पुणे (हवेली) : शेअर खरेदी व विक्री करण्याच्या नावाखाली जादा पैसे मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची सायबर चोरट्यांनी सव्वा २ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना डिसेंबर २०२४, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दिवांनशी अग्रवाल, अशोक रेडी व चाणक्य अय्यर या तीन सायबर चोरट्यांविरोधांत यांच्या विरोधात माहीती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विद्यार्थिनी ही हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती १३ डिसेंबर २०२४ रोजी घरी असताना तिला (१२) ९३९४ Shoonya Wealth link या नावाचे व्हॉटसअॅप ग्रुपमधील अॅडमिन इसम नामे दिवांनशी अग्रवाल, अशोक रेडी व Gò G111 Shoonya Wealth Link या ग्रुपचे अॅडमिन चाणक्य अय्यर यांनी ग्रुपमध्ये सामील करून घेतले.
त्यानंतर TRASHOONYA या शेअर मार्केटच्या अॅपमध्ये डिमॅट खाते उघडुन त्यामध्ये इंट्रा डेचे शेअर खरेदी व विक्री करण्यास सांगितले. तसेच ममता मशिनरी लिमीटेड कंपनी व सिटी कैम कंपनीचे आयपीओला सब्क्राईब करण्याचे नावाखाली २ लाख ३२ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करीत आहेत.



