लाल किल्ल्यावरील ध्वजवंदनासाठी महाराष्ट्रातील 17 सरपंचांना आमंत्रण ; पुणे-सोलापूरातील दोघांचा सन्मान…

नवी दिल्ली : देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (15 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील तब्बल 17 सरपंचांना पत्नीसह आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा गावचे सरपंच संदीप ढेरंगे आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद ऊर्फ संतोष लोंढे यांचा समावेश आहे.
सरपंच म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पंचायतराज मंत्रालयाकडून या निमंत्रणाचा सन्मान केला जातो. लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासोबत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान दिल्लीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांवर मार्गदर्शन, अनुभव कथन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
संदीप ढेरंगे यांनी “स्मार्ट कोरेगाव भीमा” ही संकल्पना राबवित पाणीप्रश्न सोडविण्यासाठी वनजमीन व शासकीय निधी मिळविण्यास यश मिळवले. त्यांच्या पत्नी व माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली ढेरंगे हेसुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
प्रमोद लोंढे यांनी लोंढेवाडीत 24 तास पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेवर आधारित योजना, सौर वॉटरहिटर, पाच हजार रोपांची लागवड आणि पर्यटन केंद्र विकसित करण्याचे कार्य केले आहे. या निमंत्रणाद्वारे दोन्ही सरपंचांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे.
Editer sunil thorat




