
तुळशीराम घुसाळकर
पुणे : पुणे शहरातील रेल्वे स्थानकावरील ताण आणि पुणे–नगर महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने पुणे–अहिल्यानगर दरम्यान ९८ किलोमीटरचा दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्याचे नियोजन केले आहे. या मार्गावर लोणी काळभोर, कोलवडी, वाघोलीसह १२ प्रास्ताविक स्थानके उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणार आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने या प्रकल्पाचा अंतिम आराखडा (डीपीआर) सादर केला असून, मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून काम हाती घेण्यात येणार आहे. प्रस्तावित मार्गावरून रेल्वे १६० किमी प्रतितास वेगाने धावणार असल्याने पुणे–नगर प्रवास दीड तासांत पूर्ण होणार आहे.
या मार्गासाठी हवेली, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यातील ७८५.८९८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यात खासगी जमीन ७२७.९२५ हेक्टर, सरकारी जमीन १३.०१६ हेक्टर आणि वनजमीन ४४.९५६ हेक्टर आहे. सर्वाधिक जमीन शिरूर व पारनेर तालुक्यातून जाणार आहे.
प्रस्तावित स्थानके: लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढू, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, चास आणि अहिल्यानगर. लोणी काळभोर स्थानकावरून नवीन मार्गिका तयार होऊन ते जंक्शन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे परिसराचा विकास वेगाने होईल.
तळेगाव–उरुळी कांचन आणि पुणे–अहिल्यानगर हे दोन नवीन रेल्वेमार्ग रेल्वे बोर्डाच्या योजनेंतर्गत उभारले जाणार असून, तळेगाव–उरुळी मार्ग दुहेरी करून तिसरी व चौथी मार्गिका म्हणून विकसित केला जाणार आहे.
Editer sunil thorat




