शिंदेंना सोडून अजित पवारांकडे ; हेमलता पाटील यांचा १९ ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश…

नाशिक : काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या व नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय अखेर पक्का झाला आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईत त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.
राज्यात सत्ता परिवर्तनानंतर महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप व शिंदेसेनेचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, शिंदेसेनेत प्रवेश करून काही काळानंतर असमाधानी झालेल्या हेमलता पाटील यांनी अखेर एकनाथ शिंदेंची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून त्यांनी माजी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना चुरशीची लढत देत तब्बल ४६ हजार मते मिळवली होती. मात्र, आघाडीतील जागावाटपात त्यांना संधी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. स्थानिक राजकारणातील मतभेदांमुळे त्यांनी पुन्हा शिंदेसेनेलाही रामराम ठोकला.
अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. “राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा समविचारी पक्ष आहे. अजित पवारांची कामाची गती, लोकहितासाठीचे तातडीचे निर्णय यावर माझा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे मला योग्य वाटते,” असे त्या म्हणाल्या.
या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात नवीन समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
Editer sunil thorat




