ज्यांनी पोटभरले, त्यांनाच लुटले; मालकाची स्कुटी, संगणक, प्रिंटरसह ८९ हजारांचा ऐवज घेऊन पळाले कामगार; पोलिसांनी मनमाडला पकडले!

पुणे (बारामती) : विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पाहुणेवाडी गावातील ‘हॉटेल अमित’मध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनीच मालकाला लुटून पलायन केले. मात्र पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत आरोपींना मनमाड रेल्वे स्टेशनवर मुद्देमालासह पकडण्यात आले.
१५ ऑगस्टच्या रात्री हॉटेल बंद करून मालक अमित उदयसिंह जगताप घरी परतले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच कामगार सुरज रामनरेश वर्मा व विकास बाधम (दोघे रा. उत्तर प्रदेश) यांनी संगनमत करून चोरी केली. त्यांनी
४० हजारांची सुझुकी अॅक्सिस स्कुटी,
२० हजारांचा संगणक (सीपीओ व कीबोर्डसह),
१० हजारांचा प्रिंटर,
४ हजारांचा ओव्हन,
४ हजारांचा मिक्सर,
८ हजारांचा सँडविच पिलर,
३ हजारांचे वायफाय मशीन
असा एकूण ८९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आणि उत्तर प्रदेशकडे पळ काढला.
घटनेनंतर जगताप यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सहायक निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. हे दोघे दौंड मार्गे मनमाडकडे रेल्वेने पलायन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे व त्यांच्या पथकाने केली.
Editer sunil thorat




