
सिकंदर नदाफ
सोलापूर : जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत आरक्षणासाठी नवा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमधील आरक्षण पद्धतीचा आता काहीही संबंध राहणार नाही. त्यामुळे आधीच्या आरक्षणाच्या अंदाजावर निवडणुकीची तयारी करणाऱ्यांची फसगत होण्याची शक्यता आहे.
जुनं सूत्र रद्द…
१९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मधील झेडपी व पंचायत समिती निवडणुकांसाठी १९९६ ची नियमावली लागू होती. मात्र, ग्रामविकास विभागाने आता नवीन नियमावली जाहीर केली असून “महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम १९९६” रद्द करण्यात आले आहेत.
आरक्षणाचा नवा फॉर्म्युला…
२०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती व जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गट/गणापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने जागा वाटल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्या भागात लोकसंख्या अधिक, त्या भागात एससी/एसटी आरक्षण निश्चित होईल.
🔹 अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी किती जागा राखीव असाव्यात याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.
🔹 ओबीसी आरक्षण फिरत्या पद्धतीने दिलं जाणार असून, यापूर्वी ओबीसीसाठी राखीव न झालेल्या गट/गणातून ते निश्चित केले जाईल.
🔹 हा नवा फॉर्म्युला केवळ २०२५ च नाही तर पुढील सर्वच झेडपी व पंचायत समिती निवडणुकांसाठी लागू राहणार आहे.
अधिकारी काय म्हणतात?…
“जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट-गणाच्या आरक्षण प्रक्रियेसाठी नवी नियमावली लागू झाली आहे. मात्र, आरक्षण सोडतीबाबत अजून सूचना आलेल्या नाहीत. सूचना प्राप्त झाल्यानंतर नव्या नियमानुसार प्रक्रिया केली जाईल,” अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
मतदार यादी व आरक्षण सोडत…
सोलापूर जिल्ह्यातील झेडपीच्या ६८ गटांसाठी आणि ११ पंचायत समित्यांच्या १३६ गणांसाठी मतदार यादी तयार केली जात आहे.
१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार २८२ मतदार आहेत. प्रारूप मतदार यादी जाहीर करणे, आक्षेप-हरकती स्वीकारणे, सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ही प्रक्रिया होणार आहे.
या प्रक्रियेसोबतच आरक्षण सोडतही काढली जाणार असून, ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही दोन्ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Editer sunil thorat




