चाकण वाहतूक कोंडीवर तोडगा लवकरच! केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्तक्षेपाने पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला गती ; तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता NHAI कडे जाणार ; खासदार डॉ अमोल कोल्हे…

नवी दिल्ली : चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आज संसदेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. यावेळी पुणे-नाशिक महामार्गाचे काम लवकर सुरू करण्याची तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) कडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित करण्याची मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली.
गडकरींनी या भेटीत महत्त्वाचे आश्वासन देताना सांगितले की, पुणे-नाशिक महामार्गाच्या कामातील अडथळे दूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता प्रकल्पावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
चाकण परिसरातील औद्योगिक वाढ आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या ठरत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून राज्य सरकारने Comprehensive Mobility Plan अंतर्गत पर्यायी रस्त्यांची आखणी करणे व MRIDC च्या माध्यमातून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणे अत्यावश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत राज्य सरकारकडूनही प्रकल्पांना योग्य गती मिळावी, अशी अपेक्षा खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या कडून व्यक्त करण्यात आली आहे.
Editer sunil thorat




