जीएसटी 2.0 ची सुरुवात ; दोन करस्लॅब रद्द, वस्तू होतील स्वस्त वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : देशाच्या कररचनेत मोठा बदल घडवून आणत केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) यामध्ये सुधारणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात “जीएसटीमध्ये मोठे बदल होणार असून दिवाळीत आनंदाची बातमी मिळेल” असे संकेत दिले होते. त्यानुसार आज (२१ ऑगस्ट) झालेल्या जीएसटी मंत्रिगटाच्या महत्त्वाच्या बैठकीत दोन करस्लॅब रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
सध्या जीएसटीचे चार करस्लॅब आहेत – ५%, १२%, १८% आणि २८%. यापैकी १२% आणि २८% हे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता जीएसटीमध्ये फक्त ५% आणि १८% हे दोनच प्रमुख करस्लॅब राहणार आहेत.
नवे दर असे राहणार…
१२% करस्लॅबमधील वस्तूंवर आता केवळ ५% जीएसटी आकारला जाईल.
१८ ते २८% दरम्यान असलेल्या वस्तूंवर एकसमान १८% जीएसटी राहील.
तसेच, महागड्या आणि व्यसनाधीन वस्तूंसाठी ४०% चा स्वतंत्र नवा स्लॅब लागू करण्यात आला आहे.
या नव्या स्लॅबमध्ये पान मसाला, गुटखा, तंबाखू उत्पादने, ऑनलाईन गेमिंग, लग्झरी कार, एसयूव्ही कार आदी वस्तू व सेवांचा समावेश असेल.
यामुळे अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सेवांवरचा जीएसटी कमी होऊन त्या ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत. तर दुसरीकडे, लक्झरी वस्तू व व्यसनाधीन उत्पादने अधिक महाग होणार आहेत.
या निर्णयासह “जीएसटी 2.0” या नव्या पर्वाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीय सरकारने स्पष्ट केले आहे. करप्रणाली सुलभ करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
Editer sunil thorat




