शिंदेवाडी खून प्रकरणाचा राजगड पोलिसांकडून जलद उलगडा ; १२ तासांत आरोपी ताब्यात…

पुणे (ता. भोर) : शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरात आढळलेल्या मृतदेहाच्या तपासात राजगड पोलिसांनी केवळ १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा करत अज्ञात आरोपींना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमींच्या आधारे पथके तयार करून कारवाई केली.
मृताची ओळख…
डोंगरावर मृतदेह आढळलेल्या तरुणाची ओळख सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, पुणे, मुळ सोलापूर) अशी झाली. मृताविषयी १८ ऑगस्ट रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली होती.
तपासाचा धागा…
प्राथमिक तपासात मृतास कोणी व का मारले याची माहिती मिळत नव्हती. मात्र, डी.बी. पथकातील पो.शि. अक्षय नलावडे यांना मिळालेल्या तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा ठाव लागला.
आरोपींची नावे…
राजगड पोलिसांनी सापळा लावून खालील आरोपींना ताब्यात घेतले :
1. श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. वडगाव मावळ)
2. संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ)
3. नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्षे ५ महिने, रा. कात्रज, पुणे, मुळ रा. लातूर)
4. तसेच तीन विधिसंर्घषित बालक (अ), (ब), (क).
खुनामागील कारण…
मृत सौरभ आठवले हा शेजारील अल्पवयीन मुलीस ‘बहिण’ मानून शाळेत ये-जा करत असे. त्या मुलीशी विधिसंर्घषित बालक (अ) याचे प्रेमसंबंध होते. मृताने ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्याने आरोपीचा संताप वाढला. या रागातूनच आरोपींनी योजना आखून सौरभ याला जुन्या कात्रज बोगद्याच्या डोंगरावर नेऊन कोयत्याने व इतर हत्यारांनी वार करून खून केला.
पोलिसांची कारवाई…
आरोपींकडून अॅक्टिव्हा, स्प्लेंडर मोटारसायकल व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासादरम्यान शस्त्रास्त्रे आणि तांत्रिक पुरावे हाती लागले असून आरोपींवर बी.एन.एस. कलम १०३(१), आर्म्स अॅक्टसह वाढीव कलमे दाखल करण्यात आली आहेत. अटक आरोपींना न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रशंसनीय कामगिरी…
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कामगिरी बजावली.
Editer sunil thorat




