
पुणे : अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमण २०११ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना प्रसाद तयार करताना आणि वाटप करताना काटेकोर स्वच्छता पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन सु. ग. अन्नपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांना दिला जाणारा प्रसाद काचेच्या भांड्यात किंवा पारदर्शक फूड ग्रेड प्लॅस्टिकच्या डब्यात झाकून ठेवावा. प्रसाद शिळा नसावा, तो हाताळणाऱ्या व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत तसेच त्यांनी हात साबणाने धुतलेले असावेत. नाक, कान, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, तंबाखू सेवन किंवा धूम्रपान करणे कडक मनाई आहे. संसर्गजन्य आजार असणाऱ्यांना प्रसाद तयार करणे वा वाटप करण्यास परवानगी नाही.
प्रसाद बनविणाऱ्यांनी नखे स्वच्छ कापलेली असावीत, हातमोजे, ऍप्रॉन, केस झाकणारी टोपी व चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थांपासून तयार प्रसाद ताजा असावा व शिल्लक प्रसाद योग्य तपमानास साठवला जावा. प्रसादासाठी वापरली जाणारी भांडी स्वच्छ धुवून व कोरडी करूनच वापरावीत. पिण्याचे पाणी उकळून व निर्जंतुक करूनच भाविकांना द्यावे.
मंडळांनी कचरा व्यवस्थापनासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवणे बंधनकारक आहे. कच्चे अन्नपदार्थ फक्त परवानाधारक दुकानातून खरेदी करावेत व खरेदीची बिले जपून ठेवावीत.
महत्त्वाचे म्हणजे, प्रसाद स्वतः तयार करून वाटप करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाने अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी मंडळांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये फी भरून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Editer sunil thorat




