गणेश प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त जाहीर ; ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वामुळे उत्साह दुणावला…

पुणे : घराघरात साजरा होणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक जीवनाला ऊर्जा देणारा गणेशोत्सव यंदा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा हा मंगल दिवस अत्यंत शुभ मुहूर्तावर येत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.
शुभ मुहूर्त व पूजेचा कालावधी…
पंचांगानुसार चतुर्थी तिथी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १:५४ वाजता सुरू होऊन २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३:४४ वाजता समाप्त होईल. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० हा सर्वात उत्तम कालावधी आहे. या सुवर्ण मुहूर्तात गणेशाची स्थापना केल्यास घरात सुख, शांती व समृद्धी नांदते, असा समज आहे.
गणेशोत्सवाचा समारोप ६ सप्टेंबर २०२५, शनिवार रोजी विसर्जनाने होईल. काही जण दिड दिवस, पाच दिवस किंवा नऊ दिवस गणपती ठेवतात. तर सार्वजनिक मंडळांमध्ये बहुतेक ठिकाणी दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व…
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून ऐतिहासिक व सामाजिक दृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राष्ट्रभावना वृद्धिंगत करण्यासाठी याला चालना मिळाली. पुढे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटीत लोकांना एकत्र आणण्यासाठी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. त्यामुळे गणेशोत्सव हा एकतेचं व समाजजागृतीचं प्रतीक बनला.
आजही या उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम व भक्तिसंगीताची रेलचेल पाहायला मिळते.
गणेशजन्माची कथा…
पुराणकथेनुसार, पार्वतीने उटण्याच्या मातीपासून गणेशाची निर्मिती केली. घराच्या दाराशी रक्षक म्हणून उभं केल्यावर भगवान शिवांनी अनोळखी मुलगा म्हणून गणेशाचं मस्तक छाटलं. पार्वतीच्या व्याकुळतेने शिवांनी त्याला हत्तीचे शिर लावून पुनर्जीवित केले. तेव्हापासून गणेशाला “गजानन” म्हणून पूजा केली जाते.
भक्तिमय वातावरण…
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात महाराष्ट्रभर भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर ते विदर्भापर्यंत सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे.
Editer sunil thorat









