श्री गणेश आरती, देवी-देवतांच्या आरत्या – सगळं मिळवा या एका ठिकाणी, एका क्लिकवर पहा…

पुणे : गणेशोत्सवाच्या दिवसांत आरतींचा गजर संपूर्ण वातावरण मंगलमय करतो. गणेशापासून शिव, देवी, दत्त, विठोबा अशा सर्व आरत्या आता भक्तांना एका ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत.
आरती म्हणताना होणारा गजर, टाळ-मृदूंग, घंटेचा नाद आणि भक्तांचा उत्साह – यामुळे भक्तीभाव अधिक वृद्धिंगत होतो.
खाली प्रमुख संपुर्ण आरत्या दिल्या आहेत…
श्रीगणपतीची आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रें मनकामना पुरती ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।
श्री शंकराची आरती…
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जल वाहे निर्मळ झुळझुळा ।।
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।
देवी दैत्यीं सागरमंथन पै केले
त्यामाजी अवचित हालाहल जें उठिले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें
नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ।।
व्याघ्रांबरफणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी
रघुकुलटिळक रामदासाअंतरी ।।
देवीची आरती…
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणांते वारी
हारी पडलो आतां संकट निवारी ।।
जयदेवी जयदेवी महिषासुरमथिनी
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।
त्रिभुवन भुवनी पाहतां तुजऐसी नाहीं
चारही श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करितां पडिलें प्रवाहीं
ते तू भक्तांलागीं पावसि लवलाहीं ।।
प्रसन्न वदनें प्रसन्न होसी निजदासां
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ।।
श्री दत्ताची आरती…
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द नये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ।।
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिंता ।।
सबाह्य अभ्यंकरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात ।
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।।
दत्त येऊनियां उभा ठाकला
भावे साष्टांगें प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।।
दत्त दत्त ऐंसे लागले ध्यान
हारपलें मन झालें उन्मन ।
मीतूंपणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ।।
श्री विठोबाची आरती…
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।
जयदेव जयदेव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ।।
तुळशींमाळा गळां कर ठेवुनि कटीं
कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णांची कमळे वनमाळा गळां ।
राई रखुमाई राणीया सकळा
ओंवाळिती राजा विठोबा सावळा ।।
ओंवाळू आरत्या कुर्वंड्या येती
चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती ।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती ।।
🙏 प्रार्थना
घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें
प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा,
बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात्
करोमि यद्यत्सकलं परस्मै,
नारायणायेति समर्पयामि ।।
🌸 मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजयन्त देवाः..
Editer sunil thorat







