
डॉ. गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो येथे आज गणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक वातावरणात व मोठ्या उत्साहात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी शुभमुहूर्तावर पाटील दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा व आरती संपन्न झाली.
गणराय हा विघ्नहर्ता व मंगलमूर्ती असल्याने प्रत्येक शुभकार्याची सुरुवात त्याच्या पूजनाने केली जाते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना बळ मिळाले असून, परतीचा पाऊसही चांगला यावा, यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी गणेश चरणी साकडे घातले. “गणरायाच्या कृपेने आगामी वर्ष हे शेतकरी व नागरिकांसाठी सुख-समृद्धीचे आणि समाधानाचे जावो,” अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्वाचा सोहळा आहे. घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिमाखात साजरा केला जात आहे. पाटील कुटुंबाच्या भाग्यश्री निवासस्थानी यंदा आकर्षक सजावटीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था केली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, निराभिमा कारखान्याच्या चेअरमन सौ. भाग्यश्री पाटील तसेच युवा नेते राजवर्धन पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत मंत्रोच्चारात मनोभावे गणेशपूजन केले. यावेळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पाटील म्हणाले, “श्री गणेशाचे आगमन हे आनंद, उत्साह आणि ऐक्याचा संदेश देणारे आहे. गणराया प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगती, भरभराट आणि समाधान घेऊन येवो.”
Editer sunil thorat






