
पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) नवीन स्वयंसेवकांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना NSS चे महत्त्व, उद्दिष्टे आणि सामाजिक कार्याची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी “आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखून स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि उत्तम माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना” असे मत व्यक्त केले. त्यांनी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत अशा समाजोपयोगी उपक्रमांमधील NSS स्वयंसेवकांचा सहभाग अधोरेखित केला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत होते, असेही ते म्हणाले.
पुणे जिल्हा समन्वयक व NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता कुलकर्णी यांनी Not Me, But You या NSS च्या ब्रीदवाक्याचे महत्त्व स्पष्ट केले. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी NSS कशी मदत करते, यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, हेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्राचार्य म्हणून डॉ. नितीन घोरपडे यांच्या १७ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त NSS विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
उद्बोधन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. हृषीकेश मोरे, डॉ. शैला धोत्रे, प्रा. सविता भुजबळ, डॉ. वंदना सोनवले, प्रा. शीतल गायकवाड, प्रा. अर्चना श्रीचीप्पा, प्रा. महेश्वरी जाधव, प्रा. कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. वंदना सोनवले यांनी केले.
Editer sunil thorat





