
पुणे (हवेली) : महाराष्ट्र शासनाने यावर्षीचा गणेशोत्सव ‘राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहर पोलीस दलाचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपल्या हद्दीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परदेशी विद्यार्थ्यांना आरतीचा सन्मान…
दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी एम. आय. टी. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने गणपती आरतीचा सन्मान करण्यात आला. या माध्यमातून त्यांना भारतीय संस्कृती, गणेशोत्सवाचे महत्त्व तसेच परंपरेची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाडाचे रोप भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
वृक्षारोपणातून सामाजिक संदेश…
त्याच दिवशी सकाळी ११ वाजता पृथ्वीराज हायस्कूल, लोणी काळभोर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गावचे सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा उत्तम संदेश देण्यात आला.
आदर्श विसर्जन मिरवणुकीचा संदेश…
सायंकाळी ग्रामस्थांना आरतीचा सन्मान देऊन आदर्श विसर्जन मिरवणूक, मूर्तीदान व पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सव काळातील इतर उपक्रम…
गणेशोत्सव काळात लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. यात रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्त्रियांवरील अत्याचार प्रतिबंधासाठी एकपात्री नाटक, व्यसनमुक्तीवर पथनाट्य, मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम या विषयावर पथनाट्य, सायबर क्राईम विषयक व्याख्यान, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, अनाथ व विशेष बालकांना आरतीचा सन्मान तसेच बक्षीस वितरण यांचा समावेश आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठीही पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पुणे शहर पोलीस दलातर्फे अशाप्रकारचा आगळावेगळा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला असून सर्वसामान्य नागरिकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याची संकल्पना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यात पोलिस प्रशासन यशस्वी होत असल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले.
Editer sunil thorat







