लोणी काळभोर पोलिसांची पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक ; नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि आदर्श…

पुणे (हवेली) : गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा गजर, शालेय विद्यार्थ्यांचा लेझीमवर ठेका, पारंपरिक वेशभूषेत महिलांच्या फुगड्या, तर पोलीस अधिकारी ते अंमलदार सर्वांचा एकच ड्रेसकोड… अशा उत्साही आणि सांस्कृतिक वातावरणात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक यंदा पार पडली. ही मिरवणूक केवळ लोणी काळभोरच नव्हे तर संपूर्ण हवेली तालुक्यात व पुणे जिल्ह्यात नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली.
आदर्श विसर्जन मिरवणुकीचा वस्तुपाठ…
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाला पोलिसांसह पूर्व हवेलीतील नागरिकांनी अपूर्व उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत लोणी काळभोर पोलिसांनी आदर्श कसा असावा, याचा वस्तुपाठ घालून दिला. “गणेशोत्सव आनंदोत्सव असला तरी शिस्त, पारंपरिकता आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन हे महत्त्वाचे घटक आहेत”, असा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती मान्यवरांची उपस्थिती…
सकाळी अकरा वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, कमलेश काळभोर, पोलिस पाटील लक्ष्मण काळभोर (लोणी काळभोर), पोलीस पाटील प्रियंका भिसे (कदमवाकवस्ती), मिलिंद कुंजीर (कुंजीरवाडी), महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता काळभोर, ॲड. बाळासाहेब दाभाडे, ॲड. राहुल झेंडे, गफुर शेख, राहुल क्षीरसागर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी विशाल वेदपाठक यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी काळभोर पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे, अंकुश बोराडे, कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, अनिल जाधव, सर्जेराव बोबडे, पूजा माळी, पोलीस हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, बापू वाघमोडे, महेश चव्हाण, वैजनाथ शेलार, पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर
पारंपरिक वाद्यांचा गजर, लेझीमचा ठेका…
मिरवणुकीत कन्या शाळेतील मुलींनी लेझीम खेळत सहभाग घेतला. सुरताल ढोल-ताशा पथक आणि बाबा नाशिक बाजा ढोल-ताशा पथकाच्या तालवाद्यांनी वातावरण दणाणून सोडले. पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळ, मृदंग, ढोलकी वाजवून गणेशोत्सवाचा आनंद लुटला.
पुणे शहर पोलिसांच्या बँड मास्टर पथकाने आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांचे हरिपाठ. *“ज्ञानोबा-तुकोबा”*च्या गजरात त्यांच्या पदन्यासाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
ड्रेसकोड व महिलांची फुगडी…
या मिरवणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा एकसारखा ड्रेसकोड. प्रत्येकाने फेटा, कुर्ता, पायजमा परिधान केला होता, तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पारंपरिक साडी नेसली होती. “बाप्पांसमोर सर्व समान – कोणी उच्च नाही, कनिष्ठ नाही” हा सामाजिक संदेश या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. महिला, पोलिस व पोलीस पाटीलांनी बाप्पांसमोर फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
कृत्रिम हौदात विसर्जन…
कृत्रिम हौदात विसर्जन…
पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली मिरवणूक दत्तमंदिर, खोकलाई देवी चौक, गणपती मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, पाषाणकर बाग, साधना बँक, पोलिस ठाणे व बाजार मैदान या मार्गाने परिक्रमा करून दुपारी दोन वाजता बाजार मैदानावरील कृत्रिम हौदात संपन्न झाली.
विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचा प्रतिसाद…
विजेचा कानठाळा बसवणारा डीजे आवाज, गुलालाची मुक्त उधळण किंवा अनावश्यक गोंधळ न करता पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली ही विसर्जन मिरवणूक आदर्श घेण्यासारखी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. “एरवी विसर्जन म्हणजे डीजेचा दणदणाट, गुलालाचा बेसुमार वापर आणि अव्यवस्था असे समीकरण असते; पण लोणी काळभोर पोलीसांनी पारंपरिक व पर्यावरणपूरक मिरवणुकीचे सुंदर उदाहरण घालून दिले”, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat










