सिंहगड रस्ता उड्डाणपूल कार्यक्रमात पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीवर पत्रकार संघाचा निषेध ; निवेदनानंतर पोलीस आयुक्तांचे आश्वासन…
वरिष्ठ अधिकारी पत्रकारांशी नम्र, मात्र कनिष्ठ कर्मचारी दादागिरी करतात ; पत्रकार संघाची खंत; पोलीस दलाने वर्तन सुधारावे अशी मागणी

पुणे : सिंहगड रस्ता उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमात वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून गैरवर्तणूक झाल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १ सप्टेंबर २०२५ रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोयलगंगा चौकात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार, छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर वार्तांकनासाठी उपस्थित होते. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांनी पत्रकारांना चुकीची वागणूक देत प्रत्यक्ष वार्तांकनास मज्जाव केला.
पत्रकारांना हाकलून दिले…
पत्रकारांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी त्यांना ठिकाणावरून थेट हाकलून दिले. पत्रकारांना रस्त्याच्या एका बाजूला उभे करण्यात आले. काही छायाचित्रकारांना हात लावून ढकलण्यात आले, तर महिला पोलिसांना पत्रकारांसमोर काठ्या आडव्या धरून उभे राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पत्रकार पुढे येऊ नयेत यासाठी दोरी आडवी बांधण्यात आली. पत्रकार संघाने या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
पत्रकार संघाचा निषेध…
पुणे श्रमिक पत्रकार संघ ही ८५ वर्षांची जुनी संघटना असून त्यात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५०० पत्रकार सभासद आहेत. संघाच्या वतीने अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी या घटनेबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. संघाने स्पष्ट केले की, लोकशाहीत माध्यमांना वार्तांकनाचे स्वातंत्र्य असून, त्यात अडथळा आणणे अयोग्य आहे. यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी पत्रकारांशी योग्य वागतात, मात्र कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी पत्रकारांवर दादागिरी करतात, असा अनुभव अनेकदा आला आहे. विशेषतः नव्याने पत्रकारितेत येणाऱ्या पत्रकारांना या वागणुकीचा अधिक त्रास होत असल्याचे संघाने निदर्शनास आणून दिले.
आयुक्तांची तात्काळ दखल…
या निवेदनानंतर पोलीस आयुक्तांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी सर्व पोलिसांना स्पष्ट सूचना करणारे पत्र काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून पत्रकारांशी गैरवर्तणूक होऊ नये यासाठी एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्याचेही आश्वासन दिले. भविष्यात पत्रकारांच्या वार्तांकनात अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
संघाची अपेक्षा…
पत्रकार संघाने पोलिसांच्या सूचनांचे पालन पत्रकारांकडून नेहमीच केले जाते, मात्र चुकीची वर्तणूक होणे अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस दलाने पत्रकारांना योग्य वागणूक देऊन परस्पर सहकार्याचे संबंध दृढ करावेत, अशी अपेक्षा संघाने व्यक्त केली आहे.
Editer sunil thorat



