
हडपसर (पुणे) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालय, विधी महाविद्यालय, पुणे महानगरपालिका व सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील उपस्थित होत्या.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. नितीन घोरपडे म्हणाले, “चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता राखणे ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे.” त्यांनी शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप यांच्या कार्याचीही आठवण करून दिली.
शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप यांनी बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ७ सप्टेंबर १९४१ रोजी ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे श्री शिवाजी विद्यालय ही पहिली शाळा सुरू केली. त्यांनी गावोगावी बैलगाडी, सायकल किंवा पायी प्रवास करून शिक्षणाची गंगा दुर्गम भागात पोहोचवली. आज या संस्थेचे मोठ्या प्रमाणावर जाळे विस्तारलेले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. रंजना पाटील यांनी शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप यांना अभिवादन करत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या स्वच्छता अभियानात तब्बल ४३० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांचे सात गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाने वेगवेगळ्या ठिकाणी परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून परिसर स्वच्छ केला. या कचऱ्याचे संकलन सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता कुलकर्णी, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी डॉ. धीरज देशमुख, क्रीडा संचालक प्रा. ऋषिकेश कुंभार, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. गणेश गांधिले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋषिकेश कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सविता कुलकर्णी यांनी मानले.
Editer sunil thorat





