
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (पुणे) : “आधी दुसऱ्याचे कल्याण करा, मग स्वतःचे कल्याण होईल” हा संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचा जीवनमंत्र होता. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करताना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना प्रत्येक पावलावर त्यागमूर्ती सुशिलादेवींची खंबीर साथ लाभली. त्यांचे संपूर्ण आयुष्य श्रद्धा, सेवा आणि त्यागाच्या मूल्यांना वाहिलेले होते. त्यामुळेच त्या “मूर्तिमंत त्यागाचे प्रतीक” म्हणून ओळखल्या जातात, असे प्रतिपादन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. स्नेहा बुरगुल यांनी केले.
येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांची ९८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थामाता, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद व मामासाहेब काळभोर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. बापूजी साळुंखे यांचा संघर्ष आणि सुशिलादेवींची साथ…
डॉ. स्नेहा बुरगुल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, १९५४ साली “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार” या ध्येयाने प्रेरित होऊन डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. बहुजनांच्या झोपड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास होता. या कार्यात संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी संसार, पाहुणचार, भूमिगत कार्यकर्त्यांची सेवा, मुलाबाळांची जबाबदारी आणि बोर्डिंगमधील अनाथ मुलांची काळजी कोणतीही तक्रार न करता सांभाळली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमधून त्यांनी वृद्धाश्रम, अंध, अपंग आणि अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू दिल्या. डॉ. बापूजींच्या सावलीसारख्या त्या अखेरपर्यंत राहिल्या. त्याग, श्रद्धा आणि सेवाभाव यांनी सजलेले त्यांचे जीवन हेच त्यांचे खरे कार्य होते, असे गौरवोद्गार डॉ. बुरगुल यांनी काढले.
“आधी दुसऱ्याचे कल्याण करा…”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, “संस्थामाता नेहमी म्हणायच्या, आधी दुसऱ्याचे कल्याण करा, मग स्वतःचे होईल.” या भूमिकेतून त्यांनी डॉ. बापूजींना खंबीर साथ दिली. त्यांच्या निधनानंतर संस्थेतील कार्यकर्ते, बोर्डिंगमधील अनाथ व दीन-दुबळ्या मुलांची सेवा त्यांनी स्वतःची मुले मानून केली. बोर्डिंगमधील मुलांना त्यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढून प्रेम दिले. परिस्थितीतूनच माणूस घडतो आणि परिवर्तन घडवू शकतो, या विचारांवर त्यांची नितांत श्रद्धा होती.
“आई म्हणजे अंगणातील तुळस”
प्रास्ताविक करताना डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे या दहा हजार शिक्षकांची आणि अडीच लाख विद्यार्थ्यांची “आई” होत्या. म्हणूनच त्यांना “संस्थामाता” ही उपाधी लाभली. “आई म्हणजे अंगणातील तुळस, मंदिराचा कळस आहे. आई नावाची वाटे देवालाही नवलाई” अशा शब्दांत त्यांनी संस्थामातेच्या मातृत्वाचे वर्णन केले.
त्यांनी पुढे सांगितले की, आज गुरुदेव कार्यकर्ते, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आणखी बहरत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सतीश कुदळे यांनी मानले.
Editer sunil thorat




