गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन… सविस्तर माहितीसाठी…

पुणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने यासंदर्भातील माहिती जाहीर करत नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
शनिवारी सकाळी ९.३० वाजता मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होत असल्याने मध्यवर्ती पुण्यातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, जे.एम. रोड, फर्ग्युसन रोड, कर्वे रोडसह अनेक रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे. काही रस्त्यांवर सकाळपासून तर काहींवर दुपारनंतर वाहतूक बंद राहणार असून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल लागू राहील.
विसर्जनाच्या दिवशी बंद राहणारे रस्ते…
लक्ष्मी रोड: सकाळी ७ पासून
टिळक रोड: सकाळी ९ पासून
केळकर रोड: सकाळी १० पासून
कुमठेकर रोड: दुपारी १२ पासून
शिवाजी रोड: सकाळी ७ पासून
गणेश रोड: सकाळी १० पासून
बाजीराव रोड: दुपारी १२ पासून
शास्त्री रोड: दुपारी १२ पासून
जे.एम. रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, पुणे-सातारा रोड,
पुणे-सोलापूर रोड: सायंकाळी ४ पासून(वरील सर्व रस्ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील.)
नो पार्किंग झोन जाहीर…
वाहनचालकांच्या सोयीसाठी काही रस्त्यांवर नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत.
लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक
केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
कुमठेकर रोड: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक
टिळक रोड: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक
शास्त्री रोड: सेनादत्त पोलिस चौकी ते अलका टॉकीज चौक
कर्वे रोड: नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक
पोलिसांचे आवाहन…
पुणेकरांनी शनिवारी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीसंदर्भातील अपडेट तपासावेत, आवश्यक तेथे पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच पार्किंगसाठी फक्त पोलिसांनी दाखवलेल्या जागाच वापराव्यात. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Editer sunil thorat




