
तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत १९ वर्षीय मुलगी विवाहाच्या तगाद्याला कंटाळून घरातून निघून गेल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मैत्रिणींच्या चौकशीच्या आधारे मुलीचा शोध घेत तिला सुखरूपपणे तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्त केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तिला उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. पण तिचे आईवडील तिला विवाहासाठी वारंवार तगादा लावत होते. या कारणामुळे घरात वाद होत होते. अखेर नाराज होऊन तिने १५ ऑगस्ट रोजी मोबाईल बंद करून घर सोडले. बराच शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने पालकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत माने, संभाजी देवीकर, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे आदींचे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासातून तिच्या मैत्रिणींच्या ठिकाणांचा मागोवा घेतला. चौकशीतून सुराग मिळताच पथकाने शिरूर तालुक्यातील एका मैत्रिणीकडे धाव घेतली आणि मुलगी तेथे आढळून आली.
४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिला सुखरूप शोधून आईवडिलांकडे सुपूर्त केले. या कामगिरीबद्दल पुणे शहराचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्यासह स्थानिक नागरिकांकडून लोणी काळभोर पोलिसांचे कौतुक होत आहे.
Editer sunil thorat



