
हडपसर (मांजरी) : ज्ञान, भाग्य, बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाच्या उत्सवात यंदा व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम मांजरी बुद्रुक येथे राबविण्यात आला. अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था व विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून मुळामुठा नदीवरील विसर्जन घाटापर्यंत व्यसनमुक्ती जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.
या फेरीत शेकडो विद्यार्थी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात, फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत व्यसनमुक्तीचा ठसा उमटविण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर म्हणाले,
“गणेशोत्सव हा आनंद, एकत्रितपणा आणि संस्कृती जोपासण्याचा उत्सव आहे. पण अनेक तरुण विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्यासाठी दारू आणि इतर घातक व्यसनांचा आधार घेतात. सुरुवातीला नाचण्यासाठी केलेले व्यसन हळूहळू जीवन उद्ध्वस्त करते. म्हणूनच आम्ही या जनजागृती फेरीच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन करतो की, आपल्या मंडळात व्यसनी कार्यकर्ते नसावेत आणि असल्यास त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी मंडळाने पुढाकार घ्यावा. हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेशोत्सव हा सांस्कृतिक वारशाचा भाग असून त्याला व्यसनमुक्तीचा वसा जोडल्याने समाजात सकारात्मक वातावरण तयार होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन ॲड. प्रसाद कोद्रे, संदीप मेमाणे, दर्शन ईशी, मोनिका तळेकर, गौरी तावरे, अनुजा कांबळे, पूजा पांगरे व कुशल मोरे यांनी केले.
Editer sunil thorat




