मुलींमधून राज्यात पहिली, नीट परीक्षेत ६६५ गुण ; ऑल इंडिया रैंक २६…बारामतीची सिद्धी मंजाबापू बढे हिचा पराक्रम…

सु़निल थोरात
पुणे (बारामती) : बारामती (सोमेश्वर) येथील सिद्धी मंजाबापू बढे या प्राथमिक शिक्षकाच्या मुलीने ‘नीट’ परीक्षेत तब्बल ६६५ गुण मिळवीत मुलींमधून संपूर्ण देशात तिसरा तर मुलींमधूनच राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
असा पराक्रम करणारी ती बारामती तालुक्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.
केंद्रसरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) वैद्यकीय प्रवेशांसाठी नॅशनल इलीजिबिलिटी कमी एन्टरन्स टेस्ट (NEET) प्रवेश परीक्षा घेतली जाते. यावर्षी अत्यंत अवघड स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतानाही सिद्धी बढे हिने बायोलॉजी विषयात ३४०, फिजिक्समध्ये १६५ तर केमिस्ट्रीमध्ये १६० इतके उच्च गुण प्राप्त केले.
७२० पैकी ६६५ गुण मिळाल्याने तिला देशात ‘ऑल इंडिया रैंक (जनरल)’ २६ वा तर ओबीसी रँक ५ वा मिळाला आहे. मुलींमधून विचार करता ती देशात तिसरी तर राज्यात पहिली आली आहे. तिची आई सुरेखा या बारामती नगरपरिषद शाळेत तर वडील मंजाबापू हे कुरकुंभ जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणन कार्यरत आहेत.
बढे ही पहिली ते दहावी पर्यंत बारामतीमधील झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये तर अकरावी-बारावी दत्ताकला कनिष्ठ महाविद्यालयात शिकली. बारावीला तिला ८९ टक्के गुण मिळाले आहेत.
नीट परीक्षेसाठी तिला गेली दोन वर्षे अण्णासाहेब पोपट भुजबळ व विराज उमाकांत येळे यांनी मार्गदर्शन केले. दोन वर्षात एकही चाचणी, वर्ग न चुकविल्याने सिद्धी इतिहास घडवू शकली असल्याचे मार्गदर्शकानी सांगितले.
सुरेखा बडे म्हणाल्या, सिद्धीचे देशात टॉप रँकमध्ये येऊन दिल्ली एम्समध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळविण्याचे स्वप्न होते. तिच्या अतीव कष्टामुळे, सातत्यपूर्ण अभ्यासाने आणि भुजबळ व येळे सरांनी करून घेतलेल्या तयारीमुळे हे स्वप्न साकार झाले आहे.



