राज्यात महापालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला? ; जानेवारीत मतदानाची शक्यता…

मुंबई : राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा तिढा अखेर सुटला असून, या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिल्याने, निवडणूक आयोगाने प्राथमिक नियोजन सुरू केले आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर २२ किंवा २३ जानेवारीला निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकांच्या तारखा १ ते १० डिसेंबरदरम्यान अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.
रखडलेल्या महापालिका…
पुण्यासह राज्यातील तब्बल २३ महापालिकांची मुदत मार्च २०१७ ते २०२२ या कालावधीत संपली आहे. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ च्या नमुन्यानुसार ओबीसी आरक्षण कायम ठेवत निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे.
प्रभाग रचना व आरक्षण सोडत…
निवडणुकांसाठीची प्राथमिक तयारीही वेगाने सुरू आहे.
३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार.
१० ऑक्टोबरला प्रभाग रचनेची आरक्षण सोडत काढली जाणार.
सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर केल्या जातील.
२५ ते ३० नोव्हेंबरपूर्वी या याद्या अंतिम करण्यात येणार आहेत.
डिसेंबरमध्ये आचारसंहिता…
निवडणूक प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण करायची असल्याने १० डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत मतदान व निकालाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्येच आचारसंहिता लागू होणार आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी शेवटची संधी…
या घडामोडींनंतर महापालिकेच्या पायरीवर पाऊल ठेवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. आता फक्त तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांना नवरात्रीच्या मुहूर्तावरच प्रचाराची सुरुवात करावी लागणार आहे.
Editer sunil thorat




