
लासुर्णे (ता. इंदापूर) : गावातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मसाला उद्योग हा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे मसाला निर्मिती उद्योग हा लासुर्णे गावाचा ग्राम उद्योग व्हावा, असे प्रतिपादन गावाचे सरपंच सागर पाटील यांनी केले.
लासुर्णे ग्रामपंचायत व साद फाउंडेशन, इंदापूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “मसाला व्यवसाय हा महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे लासुर्णे गावातील महिलांना हा व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक पल्वलायझर मशीन व ग्राइंडर मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.”
कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड, सदस्या मनीषा अनिल पाटील, सदस्य संतोष (पिपा) लोंढे, सदस्या सोनम दिपक लोंढे, अनिल पाटील, दिपक लोंढे, विठ्ठल पाटील, महादेव रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस क्षितीज वनसाळे, महेश रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कच्च्या मसाल्यांपासून विविध प्रकारचे तयार मसाले कसे बनवायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय मसाला उद्योगासाठी आवश्यक मशिनरी, मार्केटिंग पद्धती, शासकीय योजनांची माहिती व व्यवसायाशी निगडित सर्व बारकावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी साद फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज वनसाळे, प्रशिक्षण संचालक भाग्यश्री ठाकुरदास, आशा निमसे, तसेच आप्पासो कदम, कोमल वनसाळे, हर्षल वाघमारे, वैभव निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.
Editer sunil thorat






