
तुळशीराम घुसाळकर
थेऊर (ता. हवेली) : भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी पितृपंधरवड्यात आल्यामुळे थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली नाही. तरीदेखील दिवसभर अनेक भाविकांनी श्रींच्या चरणी माथा टेकवत समाधान लाभले.
आज पहाटे पुजारी अजय आगलावे यांच्या हस्ते श्रींची महापूजा पार पडली. त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने विश्वस्त केशव विद्वांस यांच्या उपस्थितीत श्री चिंतामणीची विशेष पूजा करण्यात आली. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी देवस्थानतर्फे मंदिर प्रांगणात मांडव उभारण्यात आले होते. दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. दुपारी उपवास करणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान तर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला विशेष रंगत आणली. चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. मुक्ताराम महाराज चौधरी (जालना) यांनी सुभाष्य कीर्तन केले. त्यांच्या ओजस्वी कीर्तनाने उपस्थित भाविकांना अध्यात्मिक उर्जा मिळाली. चंद्रोदयानंतर श्रींचा पारंपरिक छबिना काढण्यात आला. गावातील प्रमुख रस्त्यांवरून श्रींची मिरवणूक निघाली असता ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात वातावरण दुमदुमून गेले. यानंतर उपस्थित सर्व भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
उत्सव काळात शिस्तबद्ध वातावरण राहावे यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच देवस्थानतर्फे जादा सुरक्षा व्यवस्था तर ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
गर्दी तुलनेने कमी असली तरीही भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला श्री चिंतामणी संकष्टी चतुर्थी उत्सव भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे चित्र दिसून आले.
Editer sunil thorat



