
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (पुणे) : गावातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या हेतूने लोणी काळभोर ग्रामपंचायतीकडून ‘सरपंच आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामसेवक एस. एन. गवारी, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर आणि माजी सदस्य पांडुरंग केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी बोलताना सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर म्हणाले, “गावातील प्रत्येक कुटुंबाची अडचण, सूचना आणि गरजा यांचे लिखित स्वरूपात संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत घराघरात पत्रके वाटली जातील. कुटुंबाने आपापल्या समस्या त्या पत्रकांवर नमूद करून, वॉर्डनिहाय नेमून दिलेल्या दिवशी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करायच्या आहेत.”
या माहितीच्या आधारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सरपंच आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य थेट गावकऱ्यांच्या भेटीला जाणार असून, त्यांचे प्रश्न आणि सूचना ऐकून घेणार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना आपल्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे समस्या तात्काळ मार्गी लागण्यास मदत होईल.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांशी संवाद अधिक दृढ होणार असून, ग्रामपंचायत प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि संवेदनशील होईल, असा विश्वास सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



