साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये ; उदय सामंत..
▪️ मराठी भाषा समृद्धीसाठी अनुवाद समिती स्थापन ▪️ अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा ॲप विकसित होणार

पुणे : दि.१० सप्टेंबर मराठी भाषेची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिकांबरोबरच शासनाचीही असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. “हिंदी भाषेची सक्ती या सरकारने केलेली नाही. उलट मराठी भाषेच्या समृद्धीसाठी शासन सदैव प्रयत्नशील राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे बोधचिन्ह ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला.
या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत यांनी पुढे सांगितले की, मराठी साहित्याचा दर्जेदार अनुवाद व्हावा यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच राज्यातील अमराठी व्यक्तींना मराठी शिकणे सुलभ व्हावे म्हणून लवकरच ॲप विकसित केले जाणार आहे. याशिवाय ज्ञानेश्वरी आणि गाथा सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचावी यासाठी लंडनमध्ये वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे विश्व साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “३३ वर्षांनंतर साताऱ्यास संमेलनाचे यजमानपद मिळाले असून, साताऱ्याच्या परंपरेला शोभेल असे संमेलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे सांगितले.
ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी साकारलेल्या बोधचिन्हातील लेखणी आणि तलवार हे साहित्यनिर्मितीबरोबरच सामाजिक दंभ व ढोंगाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार सातारच्या पेढ्यांच्या हारांनी करण्यात आला.
Editer sunil thorat





