नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न तीव्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दिलासा, “पर्यटकांनी घाबरु नये, सरकार पूर्णपणे सोबत आहे”
मुंबई : नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, महाराष्ट्र सदन आणि काठमांडूमधील भारतीय दुतावास यांच्या सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. “नेपाळमध्ये असलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुखरुप महाराष्ट्रात परत आणणे हीच आमची प्राथमिकता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील काही पर्यटक खासगी वाहनाने परत येण्यासाठी निघाले असून, ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत.
राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला असून ते सुरक्षित आहेत. त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी शासनाचे यंत्रणा सक्रिय आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये. त्यांना सुखरुप घरी परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार समन्वयाने कार्यरत आहे.”
Editer sunil thorat



