
भुवनेश्वर (ओडीशा) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेबाश्रम शाळेच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री उशिरा भयंकर घटना घडली. झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर त्यांच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी फेविक्विक टाकल्याने ८ विद्यार्थ्यांचे डोळे चिकटले.
प्राथमिक उपचारांसाठी त्यांना गोछापाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी फुलबनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, योग्य उपचार मिळाल्यामुळे गंभीर परिस्थिती टळली असून, विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नुकसान टाळले गेले. सध्या एका विद्यार्थ्याला सोडण्यात आले आहे तर सात जणांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना निलंबित केले आहे.
जिल्हा प्रशासन आणि बाल कल्याण अधिकारी घटनास्थळी पोहोचून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. हल्ल्याचा कारण, विद्यार्थ्यांमध्ये वाद किंवा इतर कोणतीही परिस्थिती होती का, याचा शोध अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
Editer sunil thorat



