लोहार महासंघाच्या कोर्टबाजीमुळे समाजाची वाटचाल ठप्प : स्वयंभू नेत्यांची स्वार्थी खेळी आणि संघटनांचा बाजार!

पुणे : लोहार समाजाच्या नावाने अनेक वर्षांपूर्वी उभा राहिलेला लोहार महासंघ आज कोर्टबाजीच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही स्वयंभू नेत्यांनी महासंघाच्या मालकीसाठी दाखल केलेल्या केसेस केवळ वैयक्तिक अहंकार आणि “मला मी”च्या राजकारणातून जन्माला आल्या आहेत. परिणामी, समाजाचे प्रचंड नुकसान होत असून एकतेची ताकद तुकड्यात विभागली गेली आहे.
केसांमुळे तालुका-जिल्हा-महाराष्ट्रात संघटनांचा सुळसुळाट…
या प्रकरणामुळे तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र पातळीवर नवीन-नवीन संघटना उभ्या राहिल्या. पण या संघटनांनी समाजाला दिशा देण्याऐवजी अजून गोंधळ माजवला आहे. एकच महासंघ पुरेसा असताना तीन-तीन महासंघांची निर्मिती झाली आहे. अशा संघटनांचा गोंधळ आणि संघर्ष यामुळे लोहार समाज प्रशासनासमोर अजूनच हास्यास्पद ठरतो आहे.
“मला मी”च्या राजकारणाने उध्वस्त लोहार समाज…
केवळ स्वार्थ आणि श्रेयासाठी कोर्टात धाव घेणारे नेते स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करतात; मात्र समाजाचा भवितव्य त्यांच्या पायाखाली तुडवलं जातं. कोर्टाच्या चकरा, खर्चीक वकिली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप — यातून समाजाचं प्रश्नांवरचं लक्ष विचलित झालं आहे. शिक्षण, नोकरी, शासकीय योजना, महामंडळाच्या सुविधा याबद्दल बोलायला कुणाकडे पुरेसा वेळ नाही.
नातेवाईक असूनही गटबाजी…
लोहार समाज म्हटलं तर सर्वजण एकमेंकांचे नातेवाईक. पण प्रत्यक्षात मात्र गटबाजी आणि संघटनांची रेलचेल दिसते. एकच पाहुणा सर्व संघटनांच्या कार्यक्रमात मानकरी बनतो, त्याचाच फोटो सर्व ग्रुपमध्ये झळकतो — पण त्यातून समाजाच्या प्रश्नांना काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
महासंघाचा निकाल प्रलंबित, पण पुन्हा कोर्टातच धाव…
महासंघाचा निकाल अजून न्यायालयात प्रलंबित असतानाही हीच मंडळी पुन्हा नव्या अर्जांसह कोर्टाच्या दारात धावत आहेत. म्हणजे, न्याय मिळवणे हे उद्दिष्ट नसून गोंधळ कायम ठेवणे हा या स्वयंभू नेत्यांचा खरा अजेंडा असल्याचं चित्र समाजात नकळत स्पष्ट होत आहे.
संघटनेच्या नावाखाली समाजाची हेळसांड…
आज संघटना नावापुरत्या उभ्या राहिल्या आहेत. नवे महासंघ निर्माण होतात, नेते फोटो काढतात, भाषणं झोडतात; पण साध्या शिष्यवृत्तीपासून ते रोजगारापर्यंतच्या समस्या मात्र तशाच राहतात. संघटनेच्या नावावर समाजाची हेळसांड करणाऱ्यांचा / स्वयंभू नेत्याचा पर्दाफाश होणं समाजासाठी गरजेचं असल्याचे काही समाज बांधव खाजगीत बोलत आहेत.
समाज एक होणार तरी कधी?
आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे — लोहार समाज एक होणार तरी कधी? गटबाजी, कोर्टबाजी आणि स्वार्थी नेत्यांच्या खेळीमुळे समाजाची उभारणी खुंटली आहे. समाजातील इतर समाज एकजूट दाखवून पुढे जात असताना लोहार समाज मात्र स्वतःच स्वतःला मागे खेचतो आहे की काय असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे चित्र आहे का?.
बाळासाहेब शेलार, लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांनी ‘द पाॅईंन्ट न्युज’24 शी बोलताना सांगितले की “सन 2000 ते 2006 या काळात सदाशिव हिवलेकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोहार समाजाला सक्षम नेतृत्व मिळाले. यांच्या नेतृत्वाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने लोहार समाज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात संघटित झाला आणि त्यातूनच समाजाला NT (B) चे आरक्षण मिळाले, मात्र आरक्षण मिळाल्यानंतर स्वार्थी नेत्यांनी महासंघात फूट पाडून स्वतःला मोठे करण्यासाठी कोर्टबाजी सुरू केली, त्यातून महासंघ फुटून तीन-तीन महासंघ निर्माण झाले आणि संघटना न्यायालयात उभे ठाकले, आज या केसांमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत असून खटले लढवणाऱ्यांना समाजाशी काहीही देणंघेणं राहिलेले नाही, ते फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी कोर्टाच्या चकरा मारतात, कुणी माघार घ्यायला तयार नाही, कुणी समजूतदारपणा दाखवत नाही, परिणामी समाजात प्रचंड नैराश्य आणि चीड निर्माण झाली आहे आणि या चीडीचा कधीतरी स्फोट होईल आणि त्याचा फटका या स्वयंभू नेत्यांना नक्कीच बसणार आहे.”
Editer sunil thorat




