मांजरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम; महिलांच्या प्रश्नांवर अजितदादांची तात्काळ दखल…

हडपसर, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंवाद कार्यक्रमाचा शुभारंभ मांजरी रोडवरील नेताजी सुभाष मंगल कार्यालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाला. या कार्यक्रमात नागरिकांनी थेट आपल्या तक्रारी मांडल्या. अजित पवार यांनी त्या काळजीपूर्वक ऐकून घेत त्वरित निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
या कार्यक्रमात सोनाली अजिंक्य घुले यांनी मांजरी विभागातील महिलांच्या गंभीर समस्या अजितदादांसमोर स्पष्टपणे मांडल्या. दररोज 30 ते 40 हजार महिला नोकरी, शिक्षण आणि कामानिमित्ताने प्रवास करतात. मात्र, बससेवेची कमतरता आणि कमी वारंवारितेमुळे महिलांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बसची संख्या आणि वारंवारिता वाढवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
याशिवाय भाजीपाला विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आणि महिलांसाठी स्वच्छ सार्वजनिक शौचालयांच्या अभावाची समस्या देखील त्यांनी अधोरेखित केली. महिलांच्या या तक्रारींवर अजितदादांनी तात्काळ प्रतिसाद देत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले व निवारणाची हमी दिली.
यावेळी सोनाली अजिंक्य घुले यांनी स्वर्गीय अजिंक्य दादा चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विभागात सुरू असलेल्या समाजोपयोगी कामांची माहिती अजित पवार यांना दिली. या कार्याचे अजितदादांनी कौतुक करत “चांगले काम करत रहा, मी कायम पाठीशी आहे,” असे आश्वासन दिले.
अजित पवार यांचा हा लोकाभिमुख उपक्रम नागरिकांच्या मनाला भिडणारा ठरला आहे. कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमामुळे आपल्याला मोठा आत्मविश्वास मिळाल्याचे सांगितले. सोनाली अजिंक्य घुले म्हणाल्या, “अजितदादांचे प्रोत्साहन आणि पाठबळ हेच आमच्यासाठी काम करण्याची खरी ऊर्जा आहे.”
Editer sunil thorat




