अब्जावधींचा घोटाळा उघड; फरार अर्चना कुटे अखेर पुण्यात सीआयडीच्या ताब्यात!
लाखो ठेवीदारांची फसवणूक ; दीड वर्षांपासून फरार अर्चना कुटे पुण्यात जेरबंद!

पुणे : लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून तब्बल दीड वर्षांपासून फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांना अखेर सीआयडीच्या पथकाने पुण्यात अटक केली. त्यांच्यासोबत आणखी एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर ठेवीदारांमध्ये दिलासा व्यक्त होत असतानाच प्रशासन व पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी…
गतवर्षी कुटे ग्रुपवर आयकर विभागाने छापे घातले होते. मोठ्या प्रमाणात करचोरी समोर आल्यानंतर ग्रुपची सर्व प्रतिष्ठान सील करण्यात आली. या कारवाईचा थेट परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांवर झाला. लाखो ठेवीदारांचे पैसे अडकले.
“कर्ज मंजूर झाले आहे, घाबरू नका” अशी दिशाभूल करून ठेवीदारांना झुलवत ठेवण्यात आले, परंतु प्रत्यक्षात एक रुपयाही परत करण्यात आला नाही. यानंतर ठेवीदारांच्या तक्रारींवरून बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे अशा ठिकाणी सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले.
सुरेश कुटे आधीच तुरुंगात…
जून २०२४ मध्ये सुरेश कुटे व आशिष पाटोदकर यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, अर्चना कुटे मात्र पोलिसांच्या मदतीने आणि आश्रयावर वर्षभर पुणे, मुंबई, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी ऐषआरामात राहत असल्याची माहिती पुढे आली होती.
अखेर सीआयडीची कारवाई…
पोलिसांपासून लपून राहिलेल्या अर्चना कुटे यांना अखेर पुण्यातील पाषाण रोड परिसरातून सीआयडीच्या पथकाने अटक केली. या वेळी आशिष पाटोदकरची आईलाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे.
ठेवीदारांमध्ये संताप…
अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून दीड वर्ष मौज करणाऱ्या अर्चना कुटेंना अटक झाल्यानंतर ठेवीदार आता “आमचे पैसे कधी परत मिळणार?” असा सवाल करत आहेत. तर दुसरीकडे, स्थानिक पोलिसांनी दिलेल्या संरक्षणामुळेच अर्चना कुटे इतक्या काळ फरार राहिल्या, असा आरोप होत आहे.
अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अर्चना कुटेंना अखेर पुण्यात जेरबंद करण्यात आले असून, ठेवीदारांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



