पूर्व हवेलीमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार ; नागरिक हैराण ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
गॅस सिलेंडर काळा बाजारा बाबत प्रशासनावर संशयाचे धुके ; नागरिक संतप्त..

पूर्व हवेली (पुणे) : ऐन सणासुदीच्या तोंडावर पूर्व हवेलीमध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराने उचल खाल्ली आहे. नागरिकांना नियमितपणे सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने त्यांना जादा दर मोजून सिलेंडर घ्यावा लागत आहे. सिलेंडर डिलरशिपमार्फत ठराविक एजंट नेमून हा काळाबाजार फोफावला असून, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
कसा होतो काळाबाजार?
सूत्रांच्या माहितीनुसार : कंपनीकडून आलेले सिलेंडर डिलरशिपकडून नागरिकांना थेट पुरवले जात नाहीत.
डिलरशिपकडून ठराविक ‘एजंट’ला ८८० रुपये दराने सिलेंडर दिला जातो.
तोच एजंट नंतर नागरिकांना तोच सिलेंडर १२०० रुपयांना विकतो.
दरम्यान, डिलरशिपला गेलेल्या नागरिकांना “सिलेंडर संपले आहेत” असा बहाणा करून रिकाम्या हाताने परतवले जाते.
या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना जादा दराने सिलेंडर खरेदी करण्यावाचून पर्याय राहत नाही.
अवैध साठा – भविष्यातील धोका…
नागरिकांकडून वसुली करून घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून अवैधरित्या विक्री करण्यात येत आहे. हा साठा गजबजलेल्या वस्त्यांमध्ये ठेवला जात असल्याने भविष्यात मोठ्या आगीसारख्या दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील प्रशासन निष्क्रिय असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
नागरिकांचा प्रश्न : घरपोच सिलेंडरचा खरा दर किती?
वाड्या-वस्त्यांमध्ये सिलेंडर घरपोच पोहोचवले जात असले तरी नागरिक गोंधळले आहेत. घरपोच सिलेंडर ८८० रुपयांना मिळतो का की १२०० रुपयांना? या दरातील फरकाचा हिशोब प्रशासनाकडून स्पष्ट केला जात नाही. यामुळे नागरिकांना फसवले जात असल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…
दररोजच्या गरजेच्या वस्तूंमध्ये मोडणाऱ्या गॅस सिलेंडरसारख्या अत्यावश्यक वस्तूवर काळाबाजार फोफावणे ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानित दराऐवजी जादा दर वसूल केला जात असताना, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने “प्रशासन या काळाबाजाराला मूकसंमती देत आहे का?” असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
कारवाईची मागणी…
“नागरिकांचे लूटमार थांबवायची असेल तर प्रशासनाने तात्काळ डिलरशिपची तपासणी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
स्थानिक नागरिक निशा सावंत सामाजिक कार्यकर्त्या यांनी प्रशासनावर थेट आरोप करत स्पष्ट केले…
👉🏻“महिन्याला सबसिडीवर गॅस सिलेंडर मिळायला हवा, पण डिलरशिपवर गेलं की ‘सिलेंडर संपले’ म्हणतात. मग एजंटकडून १२०० रुपये मोजावे लागतात. प्रशासनाने डोळेझाक केली नसती तर असा प्रकार कधीच झाला नसता.”
👉🏻“गावोगावी सिलेंडरचा साठा करून ठेवला आहे. कुठल्याही क्षणी आग लागली तर जबाबदार कोण? जनतेचे जीव धोक्यात घालून काही डिलर पैसे कमवतायत, आणि प्रशासन मूकदर्शक झालंय. हे दुर्दैवी आहे.”
👉🏻“गॅस सिलेंडरसारख्या आवश्यक वस्तूवर काळाबाजार होतोय आणि अधिकारी फक्त कागदोपत्री तपास करून थांबलेत. जर खरंच लोकांची काळजी असेल तर डिलरशिप रद्द करा, जबाबदारांवर गुन्हे दाखल करा आणि नागरिकांना दिलासा द्या.”
असे सामाजिक कार्यकर्त्या निशा सावंत (कदमवाकवस्ती) यांनी या काळाबाजारावर कडक शब्दांत प्रशासनाला जाब विचारला. त्या म्हणाल्या, “हा काळाबाजार प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही. तातडीने कारवाई झाली नाही तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.” नागरिकांच्या या संतप्त प्रतिक्रियांमुळे गॅस सिलेंडर पुरवठा यंत्रणेतील गैरप्रकार उघड होत असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
Editer sunil thorat




