गुन्हेगारीला आळा ; लोणी काळभोर परिसरातील पाच कुख्यात गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून हद्दपार…

हवेली (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर हातभट्टी, फसवणूक, बेकायदेशीर हत्यारजवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या पाच अट्टल गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार पुढीलप्रमाणे जाफर शाजमान इराणी (43), मजलुम हाजी सय्यद (48), शब्बीर जावेद जाफरी (38), शाजमान हाजी इराणी (62) – (सर्व रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, पुणे), सागर संदिप गुडेकर (24, रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली)
या गुन्हेगारांवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, धमकावणे, दुखापत करणे, बेकायदेशीर दारु विक्री, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तयार केलेला प्रस्ताव उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी मान्य करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार ही कारवाई केली. दरम्यान, जानेवारी 2025 पासून परिमंडळ 5 अंतर्गत 20 गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार, 76 गुन्हेगारांवर मोका तर 41 गुन्हेगारांना तडीपार अशी एकूण 137 गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, उपनिरीक्षक उदय काळभोर, तसेच पोलीस कर्मचारी तेज भोसले, सुनील नागलोत, दीपक सोनवणे, प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे आदींचा सहभाग होता.
Editer sunil thorat



