जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक ; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आदेश

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर आता कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रत्येक वाहन व्यवहाराची सविस्तर माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे संबंधित व्यावसायिकांना बंधनकारक राहणार आहे.
गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा उद्देश…
गेल्या काही काळात ग्रामीण भागात वाढलेल्या नागरी वसाहतींमुळे जुन्या मोटारसायकली व इतर वाहनांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु अशा व्यवहारात नोंदी व्यवस्थित न ठेवल्यामुळे चोरीच्या वाहनांची देवाणघेवाण होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पोलीस तपासात अडथळे निर्माण होतात व गुन्हे उघडकीस येण्यास विलंब होतो. हाच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक…
आदेशानुसार, जुन्या वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीसंबंधी खालील माहिती व्यवस्थित नोंदवून ठेवणे अनिवार्य आहे –
वाहनाचा क्रमांक—
इंजिन व चासी क्रमांक—
मूळ मालकाचे नाव, पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक—
मूळ मालकाचे ओळखपत्र, आरसी, टीसी पुस्तक—
खरेदीदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र—
ही माहिती केवळ रेकॉर्डसाठी न ठेवता दर ७ दिवसांनी संबंधित पोलीस ठाण्याला लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई…
या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यावसायिकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२४ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मर्यादित कालावधीसाठी अंमलबजावणी…
ही नियमावली आणि आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. या काळात सर्व व्यावसायिकांनी कडकपणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Editer sunil thorat




