‘रंगानुभूती’ महोत्सवातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी चिंचवड (दि. २० सप्टेंबर) : “पिंपरी चिंचवड शहराची ओळख केवळ औद्योगिक शहर म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक पंढरी म्हणूनही निर्माण होत आहे. ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या महोत्सवाच्या माध्यमातून शहराच्या सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळाली आहे,” अशा गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फा0उंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सव २०२५ चे उद्घाटन निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
मान्यवरांची उपस्थिती…
या प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, माजी उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, हरिभाऊ तिकोने, फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह प्रवीण भोळे, पैस कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक प्रभाकर पवार, अमृता मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थांचा सन्मान…
कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या संस्थांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये टेल्को कलासागर – टाटा मोटर्स पुणे, कलापिनी तळेगाव दाभाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड, नादब्रह्म संस्था, अथर्व थिएटर्स, दिशा फाउंडेशन, संस्कार भारती, नाटक घर, द बॉक्स, नाटक कंपनी आसक्त पुणे, महाराष्ट्र कल्चर सेंटर (एमसीसी) आदी संस्थांचा समावेश होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…
“ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात हा महोत्सव होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. ग.दि.मा हे केवळ गीतकार नव्हते तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी होते. त्यांच्या नावाने उभारलेल्या नाट्यगृहात ‘रंगानुभूती’ होत असल्याने या कार्यक्रमाला वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे.”
“पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने सांस्कृतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम करत आहे. या महोत्सवामुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळत असून मराठी रंगभूमी समृद्ध होत आहे.”
“मराठी नाटक हे समाजाचे प्रतिबिंब आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारने नवीन विभाग सुरू केला असून आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण नाट्यगृहांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे.”
महापालिकेची भूमिका…
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “नागरिकांना दर्जेदार कलानुभव देणे, नवोदित तसेच नामांकित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘रंगानुभूती’चे आयोजन करण्यात आले आहे.”
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन…
महोत्सवानिमित्त ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील कलादालनात पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक प्रवास दर्शवणारे चित्रप्रदर्शनही भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक करताना, “या माध्यमातून नवकलाकारांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळाली आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी व मिलिंद बावा यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमृता मुळे यांनी मानले.
Editer sunil thorat




