गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने भरत पवार यांचा गौरव…

पुणे : कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पवार यांना “गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
पुरस्कार वितरण समारंभ…
गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराचा मान मा. शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्या हस्ते भरत पवार यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी भूषवले. उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापक भरत पवार यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले.
मान्यवरांची उपस्थिती…
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामथे, विद्यालयाचे माजी शिक्षक सुरेश थोरात, तसेच जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अभिनंदन…
संस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ पायगुडे व सचिव रविंद्र नेर्लेकर यांनी मुख्याध्यापक भरत पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की, “शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे शाळेची शैक्षणिक प्रगती झाली असून हा पुरस्कार त्यांच्या अथक परिश्रमांचा योग्य सन्मान आहे.”
गावकऱ्यांचा सहभाग…
या विशेष क्षणी शाळेचे माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, ग्रामस्थ, तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच भरत पवार यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गौरवाचे शब्द…
या प्रसंगी शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे यांनी सांगितले की, “गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी, समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा सन्मान आहे. भरत पवार यांनी शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून जी निष्ठा दाखवली ती प्रेरणादायी आहे.”
Editer sunil thorat



