“शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने; जाणून घ्या या पवित्र विधीचे धार्मिक महत्त्व, पूजेची संपूर्ण पद्धत आणि २२ सप्टेंबरचे शुभ मुहूर्त”
घटस्थापना का केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पद्धत अन् त्याचे महत्त्व!

पुणे : हिंदू धर्मातील नवरात्र हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव असून या उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने केली जाते. यंदा शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीने सांगता होईल. नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ स्वरूपांची विधिवत पूजा केली जाते.
घटस्थापना म्हणजे काय?
घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला आणि अत्यावश्यक विधी आहे. धार्मिक मान्यतेनुसार कलश हे देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. कलशाच्या मुखात विष्णू, कंठात रुद्र आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचे वास्तव्य असते, असे शास्त्र सांगते. त्यामुळे घटस्थापनेद्वारे घरात देवीचे आवाहन केले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, सुख-शांती आणि समृद्धी नांदते. घटस्थापना यशस्वी झाल्यास पुढील नऊ दिवसांची पूजा फलदायी होते, अशी श्रद्धा आहे.
घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य पुढीलप्रमाणे…
—मातीचा घट (कलश) – स्वच्छ व पवित्र मातीचा घट
—नारळ – देवीचे प्रतीक मानून कलशावर ठेवला जातो
—आंब्याची/अशोकाची पाने
—लाल रंगाचे वस्त्र
—धान्य – गहू किंवा बार्लीचे दाणे
—पूजेचे साहित्य – रोली, तांदूळ, हळद, सुपारी, नाणे, गंगाजल आणि शुद्ध पाणी
—मातीची थाळी – कलश ठेवण्यासाठी
घटस्थापनेची पद्धत…
1. स्थान शुद्धीकरण : पूजास्थळ स्वच्छ करून त्यावर लाल वस्त्र अंथरावे.
2. धान्य पेरणे : मातीच्या थाळीत गहू किंवा बार्लीचे दाणे पेरून त्यावर कलश ठेवण्याची जागा तयार करावी.
3. कलशाची स्थापना : कलशात गंगाजल आणि शुद्ध पाणी भरून त्यात सुपारी, नाणे, हळद, रोली ठेवावी. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून लाल कापडाने सजवलेला नारळ ठेवावा.
4. पूजा व मंत्रोच्चार : कलश मध्यभागी ठेऊन देवीसमोर दिवा प्रज्वलित करून मंत्रोच्चार करावा. नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प घ्यावा.
घटस्थापनेच्या वेळी लक्षात ठेवण्यासारखे…
—घटस्थापना केवळ शुभ मुहूर्तावरच करावी.
—एकदा प्रज्वलित केलेली अखंड ज्योत नऊ दिवस विझू नये याची काळजी घ्यावी.
—पेरलेल्या धान्याचे अंकुर फुटणे हे शुभ लक्षण मानले जाते. अंकुर जितके चांगले वाढतील तितकी देवीची कृपा अधिक लाभते, अशी मान्यता आहे.
घटस्थापनेचे शुभ मुहूर्त (२२ सप्टेंबर २०२५)…
यंदा २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेसाठी तीन प्रमुख शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत…
सकाळी ६:०९ ते ७:४०
सकाळी ९:११ ते १०:४३
सकाळी ११:४९ ते दुपारी १२:३८
या मुहूर्तावर घटस्थापना करून भक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवास आणि पूजेची सुरुवात करतात.
घटस्थापनेचे महत्त्व…
हिंदू धर्मशास्त्रानुसार घटस्थापना केल्याने देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो. घरात शांती, ऐश्वर्य आणि चैतन्य निर्माण होते. दुर्गा पूजेच्या माध्यमातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मकता वाढते, अशी श्रद्धा आहे.
(टीप : ही माहिती धार्मिक मान्यता आणि उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. कोणताही महत्त्वाचा धार्मिक विधी करण्यापूर्वी जाणकार पंडित किंवा ज्योतिषी यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Editer sunil thorat





