उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा विजय ; भाजपचे खासदार निशिकांत दुबेनी राहुल गांधींवर साधला निशाणा…

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी 152 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत पहिल्याच फेरीत बहुमत मिळवलं.
या निकालानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधकांना चिमटे काढले. त्यांनी ट्विट करून म्हटलं की, “इंडिया आघाडीला 300 मते मिळाली, पण तुमचे 15 खासदार आमच्या उमेदवाराला मतदान करून पळून गेले. राहुल गांधीजी, तुमची एकता संपली का?” असं विचारत त्यांनी राहुल गांधींवर टोलाही लगावला.
यावेळी त्यांनी नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाल्याचं नमूद करत, “विरोधकांची 15 मते एनडीएकडे गेली, तर आणखी 15 मते वाया गेली. उपराष्ट्रपती मतपत्रिकेने निवडले जातात, ईव्हीएमने नाही,” अशीही टीका केली.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मात्र इंडिया आघाडीचे 100 टक्के खासदारांनी मतदान केल्याचा दावा केला होता. त्यांच्याकडे लोकसभा व राज्यसभेतील मिळून 315 खासदारांचे संख्याबळ होते. मात्र रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाल्याने, विरोधकांच्या 15 मतांमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या वेळेस दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना पाहायला मिळाला. मतमोजणीमध्ये राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना 300 मते मिळाली. विजयासाठी आवश्यक असलेला 377 मतांचा कोटा राधाकृष्णन यांनी सहज पार केला.
एकूण 781 खासदारांपैकी 767 जणांनी मतदान केलं होतं. बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आणि शिरोमणी अकाली दलाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 752 मते वैध ठरली, तर 15 मते अपात्र ठरली.
या विजयासह एनडीएने उपराष्ट्रपती पदाची बाजी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
Editer sunil thorat




