महामार्गावर भीषण अपघात : लोणी कॉर्नर येथे कंटेनर पुलावरून १५ फूट खाली कोसळला…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी कॉर्नर येथे मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एक कंटेनर थेट पुलावरून खाली कोसळले. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या दिशेने पुण्याकडे येणारे कंटेनर सकाळी सुमारास सातच्या सुमारास लोणी कॉर्नर येथे आले असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरने दुभाजक व पुलाचे कठडे तोडत थेट हॉटेल जगदंबच्या मागील बाजूस असलेल्या १२ ते १५ फूट खोल पुलाखाली कोसळले.
या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. भरपावसाच्या मुसळधार पावसातसुद्धा वाहतूक शाखेचे कर्मचारी उमेश ढाकणे, आनंद साळुंखे व सचिन कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, मार्शल खोत व ताम्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त कंटेनर बाहेर काढण्यासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली. त्याच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढून महामार्गाच्या कडेला ठेवण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Editer sunil thorat



