घोटावडे गावातील अनोळखी मृतदेह प्रकरणाचा उलगडा : सराईत रिक्षाचालकाने पैशाच्या हव्यासापोटी केला खून…

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या सात दिवसांच्या तपासानंतर घोटावडे (ता. मुळशी) गावच्या हद्दीत टाकून दिलेल्या अनोळखी मृतदेहाचा थरारक गुन्हा उघडकीस आणत सराईत रिक्षाचालकाला गजाआड केले आहे. पैशाच्या हव्यासापोटी मित्रासोबत दारू प्यायल्यानंतर त्याचाच खून करून मृतदेह टाकून दिल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
गुन्ह्याची सुरुवात…
दि. १३ सप्टेंबर रोजी घोटावडे गावच्या हद्दीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून गळ्यावर व डोक्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या. पौड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मृताची ओळख पटविणे…
घटनास्थळी मिळालेल्या आधार कार्डावरून मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तो आशुतोष मनोहर वैशंपायन (वय ४७, रा. पवई, मुंबई) असल्याचे निष्पन्न झाले. तपासात ते ४ सप्टेंबर रोजी लखनऊहून रेल्वेने पुण्यात आल्याचे त्यांच्या पत्नी अक्षदा वैशंपायन यांनी सांगितले.
सीसीटीव्ही तपासातून सूत्र…
तपास पथकाने पुणे रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये मृताचे कपडे व घटनास्थळी मिळालेल्या कपड्यांमध्ये ताडमाड आढळून आले. सीसीटीव्हीवरून वैशंपायन हे स्टेशनवरून रिक्षाने स्वारगेटकडे गेले व नंतर सिंहगड रोडच्या दिशेने प्रवास केला असल्याचे दिसून आले.
आरोपीचा मागोवा…
गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार, सदर रिक्षा सचिन प्रकाश जाधव (वय ४१, रा. धनकवडी, पुणे) या चालकाची असल्याचे समोर आले. तो पूर्वीपासूनच सराईत गुन्हेगार असून जबरी चोरी व चोरीचे तब्बल १३ गुन्हे त्याच्यावर पुणे शहरात दाखल आहेत. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो राहत्या घरातून परागंदा झाला होता. मात्र २० सप्टेंबर रोजी धनकवडी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
खुनामागचे कारण…
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. स्वारगेटवरून वैशंपायन हे त्याच्या रिक्षात बसले होते. दारूच्या नशेत त्यांनी स्वतःच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून घेतले. त्या वेळी त्यांच्या खात्यात लाखो रुपये असल्याचे जाधवच्या लक्षात आले. पैशाच्या हव्यासापोटी त्याने धारदार हत्याराने वैशंपायन यांचा खून करून घोटावडे गावच्या हद्दीत मृतदेह टाकून दिल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयीन कारवाई…
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीची रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
पोलिसांची कामगिरी…
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी, हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पौड पो स्टे चे पो नि संतोष गिरीगोसावी, स्था.गु.शा.चे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोसई हनुमंत पासलकर, पौड पो स्टे चे सपोनि संदिप चव्हाण, पोसई योगेश जाधव, श्रेणी पोसई नाना शेंडगे, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, राजू मोमीण, अतुल डेरे, वैभव सावंत, पौड पो स्टे चे पोलीस अंमलदार नंदू गडाळे, रॉकी देवकाते, सिद्धेश पाटील, दिलीप सुपे, प्रशांत बुनगे, ईश्वर काळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल सुर्यवंशी, आकाश पाटील, संदिप दराडे, बाबा पाटील, सुशांत गायकवाड, श्रीकृष्ण पोरे यांनी केली असून पुढील तपास पौड पोलीस स्टेशन करत आहेत.
Editer sunil thorat



