लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : फटाके फोडणाऱ्या बुलेटराजांवर धडक मोहिम; १८ जणांवर दंड…

पुणे (लोणी काळभोर) : फटाके फोडल्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींवर लोणी काळभोर पोलिसांनी कडक कारवाई करत १८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. मागील काही दिवसांपासून बदललेले सायलन्सर लावून आवाज करणाऱ्या बुलेटराजांविरुद्ध नागरिकांकडून तक्रारी होत होत्या.
१८ बुलेट जप्त – १८ हजारांचा दंड…
दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी हद्दीत गस्त घालत पोलिसांनी अशा १८ दुचाकी चालकांना गाठले. तपासात त्यांच्या गाड्यांना कंपनीबाहेरील सायलन्सर बसवलेले आढळून आले. त्यावर हडपसर वाहतूक विभागाच्या मदतीने एकूण १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सर्व दुचाकींवर कंपनीचे सायलन्सर पुन्हा बसवण्यात आले. याशिवाय कर्णकर्कश हॉर्न काढून त्यावरही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सतिश टेंगले, पोलीस अंमलदार सचिन कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
बुलेटराजांवर चाप…
या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरात कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर चाप बसला आहे. अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला.
Editer sunil thorat




