
हडपसर (पुणे) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘संविधान’ या विषयावर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, लोकशाही, समानता, स्वातंत्र्य, बंधुता यांसारख्या विविध मूल्यांवर आधारित कल्पक पोस्टर सादर केली.
या प्रदर्शनाला व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, अॅड. मोहनराव देशमुख तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कामाचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येक पोस्टरकडे पाहून विद्यार्थ्यांकडून त्या पोस्टरमागील संकल्पना समजून घेतली. प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिंगणापूरकर म्हणाले, “संविधान हे आपल्या राष्ट्राचे आत्मा आहे. भारताचे नागरिक म्हणून संविधानाविषयी संपूर्ण माहिती असणे आणि त्यातील मूल्ये आचरणात आणणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये संवैधानिक मूल्यांविषयी जागरूकता वाढते आणि राष्ट्रभक्तीची भावना बळकट होते.”
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. नरसिंग तावडे तसेच महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले की, “संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात संविधानाशी संबंधित विविध शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत. यामध्ये व्याख्यानमाला, पथनाट्य, पोस्टर स्पर्धा आणि चर्चासत्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूल्यांविषयी अभिमान आणि संवेदनशीलता वाढवणे हाच या उपक्रमांचा उद्देश आहे.”
या पोस्टर स्पर्धेसाठी कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांशी संबंधित विषयांवर अत्यंत समर्पक आणि कलात्मक मांडणी केली. परीक्षकांनी सर्जनशीलता, मांडणी आणि विषयसुसंगततेच्या आधारे प्रथम तीन क्रमांक निवडले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋषिकेश मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नरसिंग तावडे यांनी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. नरसिंग तावडे, प्रा. ऋषिकेश मोरे आणि प्रा. कर्डिले यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे वातावरण महाविद्यालय परिसरात पाहायला मिळले.
Editer sunil thorat





