मंडळ अधिकारी कार्यालयासमोरून अवैध वाळूच्या गाड्या ; ग्रामस्थांचा संतप्त सवाल…
अवैध वाळू वाहतूक प्रकरणात महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...

लोणी काळभोर (ता. हवेली) : परिसरात अवैध वाळू वाहतूक उघडपणे सुरू असतानाही महसूल विभागातील अधिकारी मात्र डोळेझाक करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही वाहतूक मंडलाधिकारी, तलाठी कार्यालय नाकासमोरूनच सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी तलाठी बालाजी वनवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ “तक्रार द्या मग मी कारवाई करतो” असे म्हणत जबाबदारी झटकली. या उत्तरामुळे महसूल विभागाच्या कारभाराबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार राजरोसपणे पहाटे गावासमोरील मुख्य रस्त्यांवरून शासनाची लाखोंची राॅयलटी बुडवून अवैध वाळूची डंपर (ट्रक) धडाक्यात जात असतानाही महसूल प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या अवैध वाळू व्यवसायाला तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयाचे अप्रत्यक्ष अभय आहे का? असा चर्चेला उधाण आले आहे.
यासंदर्भात विचारले असता संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर न देता प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. या भूमिकेमुळे महसूल प्रशासनाची प्रामाणिकता व कार्यक्षमता यावर संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या अवैध वाळू उपशामुळे शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत असून काही मोजक्या व्यक्तींची तिजोरी मात्र भरली जात असल्याची चर्चा गावपातळीवर जोरात रंगली आहे.
स्थानिक सामाजिक संघटनांनी इशारा दिला आहे की, महसूल विभागाने डोळेझाक थांबवून तातडीने कारवाई करावी. कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.
Editer sunil thorat



