काळेपडळ पोलिस व पुणे महानगरपालिका यांची धडक मोहीम…
हडपसरमध्ये मोक्का आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर संयुक्त कारवाई...

पुणे (दि. २६ सप्टेंबर) : काळेपडळ पोलीस ठाण्यात गु. र. नं. 100/2025 भा.न्या.स. कलम 308(2), 329(3), 351(2), 352, 189(1), 189(2), 191(2) तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) 1999 चे कलम 3(1)(क्ष्क्ष्), 3(2), 3(4), 23(1) अन्वये गुन्हा दाखल असलेल्या रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) याच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामावर आज काळेपडळ पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली.
आरोपीविरोधातील गंभीर गुन्हे
रिझवान उर्फ टिपू पठाण हा सय्यदनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, दहशत माजवणे, सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कायद्याच्या कचाट्यातून बचाव करण्यासाठी व परिसरात आपला दबदबा वाढवण्यासाठी त्याने अनधिकृत बांधकाम उभारले होते.
कारवाईचे तपशील…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला होता. सकाळपासूनच सय्यदनगर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, जेणेकरून कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये.
महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. काही तास चाललेल्या या कारवाईत अवैध उभारलेली रचना जमीनदोस्त करण्यात आली.
नागरिकांचा प्रतिसाद…
स्थानिक रहिवाशांनी पोलिस व महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. “गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कायद्याचा धाक न बाळगता उघडपणे अनधिकृत बांधकामे करतात. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
पोलिसांचा इशारा…
“गुन्हेगारी मार्गाने संपत्ती उभी करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिला.
Editer sunil thorat




