रामदरा पूल व आठवडे बाजार पत्राशेड कामांचे भूमिपूजन संपन्न ; ९८ लाख निधी मंजूर; रामदरा पूल होणार नव्याने साकार…
लोणी काळभोरमध्ये रामदरा पुलासह विकासकामांची नवी सुरुवात ; आमदार कटके...

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाला लवकरच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार असून, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी दिली. या निर्णयानंतर या परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शनिवारी (ता.४) आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या हस्ते रामदरा रस्त्यावरील नवीन मुठा कालव्यावरील पुलाचे तसेच बाजारतळ येथील आठवडे बाजार पत्राशेडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद होते.
यावेळी रामदरा शिवालयाचे महंत हेमंतपुरी महाराज, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, दिलीप वाल्हेकर, गणेश चौधरी, कमलेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
“लोकाभिमुख विकासालाच माझे प्राधान्य” : आमदार कटके…
“लोकाभिमुख विकासच लोकांसाठी खरा उपयुक्त ठरतो. शिरूर-हवेली मतदारसंघात याच तत्वावर पुढील कामे राबवली जातील,” असे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके म्हणाले. रामदरा परिसरातील कालव्यावरील पूल हा तातडीने दुरुस्त होण्याची गरज असलेला जीवनवाहिनी मार्ग असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे सुमारे ₹९८ लाख ९७ हजार १६५ रुपयांचा निधी तातडीने मंजूर झाला आहे.” त्याचबरोबर पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना, समाजमंदिरे व रस्ते या कामांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “विकासकामात कोणतीही अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क साधावा,” असे आवाहनही आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी केले.
पूल व पत्राशेडमुळे नागरिकांना दिलासा…
रामदरा रस्त्यावरील जुना पूल सुमारे ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. तो धोकादायक झाल्याने प्रशासनाने अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे हजारो नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागत होता. नवीन पुलामुळे नागरिकांच्या वाहतुकीस गती आणि सुरक्षितता मिळणार आहे.
तसेच आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांसाठी सुमारे ₹५० लाखांचा पत्राशेड प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे पावसाळ्यातील अडचणींना पूर्णविराम मिळणार आहे. दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे.
उपस्थित मान्यवर…
या कार्यक्रमाला वंदना काळभोर, प्रताप बोरकर, संजय गायकवाड, राजाराम काळभोर, अण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, इंद्रभुज काळभोर, गणेश कांबळे, हेमंत गायकवाड, गुरुदेव काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, युवराज काळभोर, राहुल काळभोर, बकुळा केसकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र काळभोर यांनी तर आभारप्रदर्शन नागेश काळभोर यांनी केले.
Editer sunil thorat








