
पुणे : वय हा केवळ एक आकडा असून प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने कोणत्याही वयात नवीन पर्व सुरू करता येते. वयामध्ये अडकू नका, ‘ज्येष्ठ’ या शब्दाऐवजी दुसरे नाव देता येईल का, याचा विचार झाला पाहिजे. निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी असते, कारण ज्येष्ठांचा अनुभव ही नव्या पिढीसाठी मोठी संपत्ती आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
त्या यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे आयोजित ‘ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्या’त बोलत होत्या. या कार्यक्रमात राज्यभरातील निवडक ज्येष्ठ नागरिकांचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ प्रदान करून गौरव करण्यात आला. खासदार सुळे व वस्तू आणि सेवा कर विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजीनगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर आणि मुंबई येथील सलमा खान यांना राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच, लातूर येथील ज्येष्ठ नागरिक संघास संस्थात्मक सन्मान देण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पवार साहेबांनी ६० व्या वर्षी पक्ष स्थापन केला. त्यामुळे वय हे मर्यादा नसून प्रेरणास्थान आहे. आजचे ज्येष्ठ नागरिक स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांचे आहेत, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचा अनुभव अमूल्य आहे. कौतुकाचा सोहळा म्हणजे शेवट नव्हे; तर समाजासाठी मार्गदर्शन सुरू ठेवण्याचा संकल्प आहे.”
विशेष आयुक्त नितीन पाटील म्हणाले, “चव्हाण सेंटर हे तळागाळातील लोकांशी संवाद साधून समाजाभिमुख कार्य करत आहे. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यास आम्ही सज्ज आहोत. ज्येष्ठ नागरिकांची मतशक्ती (Voting Power) मोठी आहे, तिचा वापर सामाजिक बदलासाठी करावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रमोद ढोकले यांनी केले. दत्ता बाळसराफ यांनी प्रास्ताविक केले, तर दीपिका शेरखाने यांनी आभार मानले.
Editer sunil thorat




