
पुणे : ब्राह्मण समाजातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरोहितांचा गौरव करण्याच्या उद्देशाने “अखिल भारतीय जिल्हा ब्राह्मण पुजारी संमेलन” हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
हा मेळावा दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक ४ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, नरवीर तानाजी मालुसरे रोड (सिंहगड रोड), अभिरुची मॉल शेजारी, पुणे येथे संपन्न झाला.
संमेलनाचे उद्घाटन वैदिक मंत्रोच्चाराने आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास विविध जिल्ह्यांतून आलेले शेकडो पुरोहित, वेदपाठी, तसेच धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘दाते पंचांग’ चे सुप्रसिद्ध निर्माते मोहन दाते, अध्यक्ष ब्राह्मण महासंघ वेदगुरु शिवगुरु पार्के, कीर्तन चंद्रिका पुरस्कारप्राप्त ह. भ. पा. शिवर्चना कुलकर्णी, वास्तु व ज्योतिष तज्ज्ञ किर्ती बोंगार्डे, तसेच पुजारी अमोल जोशी, कुलकर्णी, वैद्य आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात वक्त्यांनी पुरोहित समाजाचे समाजातील स्थान, धार्मिक परंपरांचे जतन, आणि नव्या पिढीपर्यंत संस्कृतीचा वारसा पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आधुनिक युगात धर्मसंवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
संमेलनाच्या शेवटी धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरोहितांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी धर्म, संस्कृती आणि समाजातील एकतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी यांच्यावतीने संतोष वैच गुरुजी, राहुन भाले शास्त्री, मनीष जोशी गुरुजी आणि अतुल जोशी गुरुजी यांनी परिश्रम घेतले.
Editer sunil thorat






