
हडपसर (पुणे) : परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले व गहाळ झालेले मोबाईल शोधून काढून ते त्यांच्या मालकांच्या हाती सुरक्षितपणे सुपूर्त करण्याचा उपक्रम आज प्रभावीपणे राबविण्यात आला. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार परिमंडळ स्तरावर हा उपक्रम २० आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी राबविण्यात येणार होता, त्यानुसार आज हा विशेष कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
हा वितरण कार्यक्रम २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान नेताजी मंगल कार्यालय, मांजरी रोड, आण्णासाहेब मगर कॉलेजसमोर, हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता. पोलिसांकडून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरविलेले मोबाईल परत देण्याच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ – डॉ. राजकुमार शिंदे प्रमुख उपस्थित होते. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त – हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त – वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांनी कार्यक्रमाची उपस्थिती दर्शवून या उपक्रमाला अधिक बळ दिले. परिमंडळ ५ मधील सर्व ९ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदारही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७१ हरविलेले मोबाईल हस्तगत — CEIR आणि Lost & Found पोर्टलमुळे मोठे यश…
पुणे शहर पोलीसांनी हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी Central Equipment Identity Register (CEIR) या राष्ट्रीय पोर्टलचा तसेच पुणे पोलीसांच्या Lost & Found पोर्टलचा प्रभावी वापर केला. या दोन्ही पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींची पडताळणी करून परिमंडळ ५ पोलिसांनी मोठी कामगिरी केली.
एकूण १७१ मोबाईल सेट विविध राज्यांतील नेटवर्कवर शोध लागून हस्तगत करण्यात आले. यामध्ये जवळपास सर्व ब्रँड्सचे मोबाईल होते. – काही महागडे, तर काही भावनिक कारणांनी महत्त्वाचे.
या सर्व मोबाईल्सचे वितरण डीसीपी डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते आज नागरिकांना करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
“मोबाईलच्या किंमतीपेक्षा त्यातील आठवणी अनमोल” — नागरिकांचा भावनिक प्रतिसाद
मोबाईल परत घेताना उपस्थित नागरिकांनी पोलिसांविषयी अत्यंत भावनिक शब्दांत व्यक्त केली.
—“मोबाईलची किंमत नव्हे, पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी अनमोल आहेत.”–
-“महत्त्वाचा डेटा, कुटुंबातील फोटो, मुलांच्या आठवणी… हे सर्व गमावले होते. पण आज परत मिळाले.”
—“हरवलेला मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण पुणे पोलिसांनी अविश्वसनीय काम केले.”
—अशा विविध प्रतिक्रिया पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणाऱ्या ठरल्या.
पोलिसांच्या तांत्रिक आणि कागदपत्रीय कामाचे कौतुक…
हरविलेले मोबाईल शोधणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. IMEI नंबर ट्रॅकिंग, नेटवर्क लोकेशन, सिम बदलानंतरची तपशीलवार माहिती, सर्व्हिस प्रोव्हायडरकडून काढलेला डेटा — या सर्व तांत्रिक प्रक्रियांमध्ये पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे काम केले.
परिमंडळ ५ मधील प्रत्येक पोलीस ठाण्याने या उपक्रमात विशेष लक्ष देऊन नियमितपणे तक्रारींचा पाठपुरावा केला, तपासकर्मी पोलिसांनी राज्याबाहेरील ठिकाणांपर्यंत जाऊन मोबाईल हस्तगत केलेली उदाहरणेही आहेत.
उपक्रमामुळे नागरिक–पोलीस नात्यात सकारात्मक बळ…
पुणे शहर पोलिसांनी हरविलेल्या वस्तू शोधून देण्याकरिता डिजिटल पोर्टल्सचा वापर सुरू केल्यापासून नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होत आहे. आजच्या कार्यक्रमाने हे नाते अधिक दृढ केले आहे.
“लोकसेवेसाठी पोलिस कटिबद्ध आहेत” — हा संदेश आजच्या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला.
Editer sunil thorat











